प्रकाशाचा अमृत महोत्सव
माझा जन्म तसा अगदी सर्वसामान्य, शेतकरी गरीब कुटुंबात झाला असल्यामुळे व लहानपणापासूनच हलाखीच्या परिस्तिथीचा सामना करून जीवन व्यतीत केले असल्यामुळे मनात नेहमी यायचे की, मोठे झाल्यावर आपण ह्या समाजासाठी नक्की काहीतरी करायचे, आपल्याला सहन कराव्या लागलेल्या यातनारुपी भेगा जरी न बुजण्यासारख्या असल्या तरी इतरांच्या आयुष्यातल्या ह्या भेगा कायमच्या मिटविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायचा. ह्या भावनेतूनच मी लहानाचा मोठा झालो आणि कष्ट करून आपल्या परिवाराचा सांभाळ आनंदाने करू लागलो.
हे सर्व करत असतांनाच दरम्यानच्या काळात कुणाची तरी माझ्या ह्या आनंदी जीवनाला दृष्ट लागली व माझ्या सुस्थितीत असलेल्या परिस्तिथीला ग्रहण लागले मी प्रचंड मानसिक तणावात राहू लागलो. एक वेळ तर अशी आली होती की, मृत्यूला जवळ करण्याचे विचार माझ्या मनपटलाला स्पर्श करून गेले.
ह्याच दरम्यान माझी ओळख अँगस्टीन जोसेफ, मॅथ्यू जोसेफ, एलिझाबेथ जोसेफ ह्या भावंडांशी झाली त्यांनी मला लहान भावाप्रमाणे जपले व अजूनही जपत आहेत, त्यांच्या माध्यमातून फादर बाबा म्हणजे फादर कावूकाट यांची व माझी भेट झाली. सगळीकडे अंधार दाटला असताना अचानक कुठूनतरी सूर्याची चाहूल लागावी व सर्व परिसर त्या उजेडात उजळून निघावा अशीच काहीशी अवस्था माझी त्यावेळी झाली.
फादर बाबा यांच्या पहिल्या भेटीतच मला त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आभास झाला. उपेक्षित पणे एका कोपऱ्यात पडलेल्या लोखंडाला अचानक परिसस्पर्श व्हावा व त्याचे रूप उजळून यावे अशीच काहीशी अवस्था माझी झाली, आणि तिथून सुरू झाला खऱ्या अर्थाने माझ्या नवीन जीवनाचा प्रवास.
फादर बाबा एक अलौकिक व्यक्तीमत्व, जात, धर्म, पंथ या गोष्टींना जवळपास फिरकू न देता ‘सारे विश्वची माझे घर’ ह्या उक्तीप्रमाणे काम ते काम करत असल्याने त्यांनी माझ्या मनात कधी घर केले व ते माझे खरेखुरे फादर बाबा कधी झाले हे मलाच कळले नाही.
दिवसरात्र फक्त समाजाचा विचार करणाऱ्या ह्या माणसाला कधीच आपल्या स्वतःच्या सुखाचा विचार करताना मी पाहिले नाही त्यामुळे मला फादर बाबा खूप भावले. माझा जन्म ज्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात झाला तो तालुका हा मुळातच एक आदिवासी, डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेला तालुका.येथे वास्तव्य करत असलेल्या अनेक लोकांच्या जीवनी अठराविश्व दारिद्र्य वाढून ठेवलेले. फादर बाबांनी अशा कित्येक लोकांना मदत करून त्यांच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर केलेला मी जवळून पाहिला आहे.
शहापूर तालुक्यातील गोकुळगांव, वाऱ्याचा पाडा येथिल गरीब, उपेक्षित लोकांसाठी फादर बाबा यांनी खूप काम केले आहे. विठ्ठल शिवारे ह्या एका आदिवासी व्यक्तीला ‘शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ मिळवून दिला जी व्यक्ती आज ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान झाली आहे यावरून फादर बाबांच्या सामजिक जाणीवेची कल्पना तुम्हाला नक्की येईल, काही वर्षांपूर्वी वाऱ्याचा पाडा येथील शेजारील गावातील लोकांच्या जमिनी समृद्धी महामार्गामध्ये जाऊन त्यांच्या कडे अचानक खूप पैसा आला परंतु जसा पैसा आला तसाच नियीजनाच्या अभावामुळे तो आला तसा निघून पण गेला पण फादर बाबांच्या शिकवणुकीमुळे दोऱ्याच्या पाडा येथील गावकाऱ्यांवर मात्र ह्या क्षणभंगुर सुखाचा अजिबात परिणाम झाला नाही. अशी अनेक उदाहरणे फादर बाबांच्या कार्याची देता येतील मग ते उल्हासनगर येथील सिंधी समजातील प्रभू चंदवानी व प्रदीप चंदवानी यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी असो वा ज्ञानेश्वरी निचिते ह्या कुपोषित गरीब घरातील मुलीला दत्तक घेणे असो आज हे सर्वचं विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत व.
ह्या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष साक्षिदार होण्याचे भाग्य मला लाभले यापेक्षा जास्त आनंद कशात असू शकेल. फादर बाबा यांच्या कार्याची यादी इथंच संपत नाही बोरशेती गावाजवळील लोबीपाडा व पोंढेपाडा ह्या आदिवासी वाडीमध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती, जीवनात अठरा विश्व दारिद्र्य पसरलेले असल्याने मुलांना शिक्षण मिळत नव्हते ह्या सर्व परिस्तिथीचा गांभीर्याने विचार फादर बाबांनी केला व गरीब आदिवासींच्या विद्यार्थ्यांकरिता ‘वस्तीशाळा’ सुरू केली आज अनेक विद्यार्थी त्या वस्तीशाळेत शिकून उच्च पदावर काम करत आहेत, इतक्यावरच फादर बाबा थांबले नाहीत तर तेथील लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून एक विहीर तयार करून दिली व प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहचण्याची व्यवस्था केली त्यामुळे तिथली लोकं भाजीपाला पिकवून जवळच्या बाजारपेठेत विकू लागले त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्तिमध्ये सुधार झाला असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे फादर बाबा.इतरांचा जीवनात आनंद निर्माण करून देणारे फादर बाबा मला खऱ्या अर्थाने देवापेक्षाही खूप मोठे वाटतात. हे सर्व करत असतांनाच मला माझा शालेय मित्र प्रसाद फर्डे व त्याच्यासोबत तरुण सुशिक्षित मित्र यांनी मिळून तयार केलेल्या ‘मानवता प्रतिष्ठान’ ह्या सामाजिक संस्थेच्या कार्याची माहिती मिळाली व मी त्यांच्यासोबत जोडून फादर बाबांच्या शिकवणुकीनुसार सामाजिक कार्य करू लागली. आज ‘मानवता प्रतिष्ठान’ ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी व माझे मित्र अनेक सामाजिक कार्य करत असतो. सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक कार्यक्रम ह्या संस्थेच्या माध्यमातून करत असतो ते सर्व फादर बाबा यांच्याकडून प्रेरणा घेऊनच हे मला प्रामुख्याने इथं नमूद करावेसे वाटते.
दिनांक 4 मार्च रोजी फादर बाबा पंच्याहत्तर वर्षात म्हणजे अमृतमहोत्सव वर्षात पदार्पण करत आहेत. खरं तर महान व्यक्तींचा वाढदिवस हा वाढदिवस नसतो तर तो एक उत्सव असतो, म्हणून 4 मार्च हा दिवस माझ्या साठी एका उत्सवाप्रमाणे, सणाप्रमाणे आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांची प्रेरणा, आशीर्वाद अखंड लाभण्याचे भाग्य मला मिळो हीच मनापासून सदिच्छा व्यक्त करतो.
श्री. कमलाकर धर्मा घरत
कोषाध्यक्ष (मानवता प्रतिष्ठान)
मु. कासगांव, ता.शहापूर
जी. ठाणे
You are such great personality , I really appreciate your work , you always think about others before you , such great being made by god and also happiest birthday to you live healthy and soulful life to father baba